टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसानी अटक केलेली आहे. त्यांच्याकडे पहिल्या धाडीत ८८ लाखांची रक्कम आणि काही दागिने सापडले होते. त्यानंतर आता दुसर्‍या धाडीत त्याच्याकडे जवळपास दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा मिळून पाच बॅगामध्ये एकूण दोन कोटी रुपये आणि काही दागिने आढळून आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून,या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

या प्रकरणात सायबर पोलिसांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुमकाराम सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पुढील तपासकामी २३ डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. तत्पुर्वी दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी नामदेव सुपे यास अटक करून, तत्काळ त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्ती पैकी ८८ लाख ४९ हजार ९८० रुपये रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले ५ ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ तोळ्याचे दागिने व ५ लाख ५० हजार रुपायंची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

त्यापुढे पोलीस कोठडीतील तपासादरम्यान आरोपीने पैशाच्या दोन बॅगांपैकी त्याच्या मुलीकडे एक पैशांची बॅग ठेवल्याची तसेच त्याच्या जावायाने त्याच्या मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा जावाई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना पोलीस ठाण्यात चौकशीकामी बोलावून त्याबाबीच खातरजमा करण्यात आली. त्यानंतर तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक घाडगे व तपास पथक, दोन पंच, आरोपी तुकाराम सुपे, जावई व मुलगी यांना सोबत घेवून सरकारी वाहनाने ते राहण्यास अलेल्या चऱ्होली, आळंदी या ठिकाणी जावून तेथे पाहणी केली असता ९७ हजार रुपये मिळाले.

परंतु माहितीप्रमाणे त्या दोन्ही बॅगा न मिळाल्याने त्यांची मुलगी व जावायाकडे कसून चौकशी केली असता, नितीन पाटीलचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील बंद फ्लॅटमध्ये त्या ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी जावून त्या फ्लॅटची झडती घेतली असता, फ्लॅटमध्ये त्या दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस मिळाल्याने त्या ताब्यात घेवून दोन पंचासमक्ष त्या उघडून त्यांची मोजदाद केली. त्यामध्ये रोख रक्कम १ कोटी ५८ लाख ३५ हजार १० रुपये इतकी असल्याचे आढळले. तसेच त्या बॅगांसोबत आढळलेल्या सुटकेस व एक बॅगमधील प्लास्टीकच्या पिशवीमध्ये दागिण्यांच्या डब्या आढळल्या. त्यात एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आढळले असून प्रत्येक प्रकारामध्ये एक किंवा अनेक नग आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two crore rupees and jewelery were found in a raid on tukaram supes house msr 87 svk