लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने आज शनिवार आणि उद्या रविवार दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तरुण-तरुणी आणि ज्यांचे नाव नोंदणी करणे बाकी आहे, अशांनी सहभागी व्हावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले.
भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मतदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड विधानसभेतील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष मोहीम आयोजित केली आहे.
आणखी वाचा-पिंपरी : जमीन खरेदी-विक्रीत नफ्याच्या आमिषाने सव्वा कोटींचा गंडा
हे फॉर्म भरून द्यावे लागणार
( फॉर्म नंबर सहा) नवीन मतदार नोंदणी
(फॉर्म नंबर सहा ए ) परदेशी मतदार म्हणून नोंदणीसाठी
(फॉर्म सहा बी) विद्यमान मतदारांव्दारे आधार क्रमांकाची माहिती
(फॉर्म सात ) आक्षेप आणि स्वतः हटवणे
(फॉर्म आठ ) दुरुस्ती, स्थलांतर, दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी हा अर्ज करावा.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील ज्या मतदार यादीत नाव नोंदविलेल्या मतदारांचे लिंग गुणोत्तर ९१० पेक्षा कमी आहे. त्या विविध विभागात मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी वॉर्ड स्तरावर महिला, तृतीयपंथी, बांधकाम व्यवसायातील मजूर, सर्व सहकारी सोसायट्या, औद्योगिक आस्थापनेवरील कर्मचारी वर्ग, दिव्यांग, बेघर व्यक्ती आदींसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीशी प्राध्यापकाचे चाळे; पोलिसांनी प्राध्यापकाला घातल्या बेड्या
या मोहिमेत जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ कार्यालय, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, थेरगाव आणि मतदार संघातील सर्व मतदान केंद्र येथे अर्ज जमा करावेत. तसेच ज्या नागरिकांना अर्ज भरणे शक्य नाही त्यांनी Voters.eci.gov.in व Voter Helpline App वर जावून आपली नोंदणी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.