पुणे : विश्रांतवाडी भागातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह परिसरातील खाणीत साठलेल्या पाण्यात शनिवारी (११ जून) सापडले. दोघेजण मित्र असून त्यापैकी एकजण सराईत गुन्हेगार आहे. विकी प्रकाश लंके (२०) आणि सुशांत सचिन बडदे (२१, दोघे रा. विश्रांतवाडी) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. लंके आणि बडदे दोघे मित्र असून विश्रांतवाडीतील भीमनगर भागात राहायला आहेत. लंके सराईत गुन्हेगार आहे. दोघे बुधवारी (८ जून) रात्री घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून ते बेपत्ता झाल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.
खाणीतील पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याचं आढळलं
दरम्यान, शनिवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरातील भीमनगर परिसरात असलेल्या खाणीतील पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलीस आणिअग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम राबविली. जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा : कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा, जळगाव पोलिसांची कामगिरी
खून झाल्याचा आरोप
बडदे आणि लंके दोघेजण चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोघांचे मृतदेह शनिवारी खाणीतील पाण्यात सापडले. दोघांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदनात मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.