लोणावळा : पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा बोट उलटल्याने पवना धरणाच्या जलाशयामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात आला. तर दुसरा मृतदेह गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक या टीमने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही दिवस शोध मोहीम राबवत धरणामधून हे मृतदेह बाहेर काढले आहेत. दुधीवरे गावाच्या जवळ जलाशयात ही घटना घडली आहे.मयूर रवींद्र भारसाके (वय २५) आणि तुषार रवींद्र अहिरे (वय २६, दोघेही मूळचे रा. पद्मावती नगर, वरणगाव रोड, भुसावळ) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रा. लि. येथे नोकरीस असणारे आठ मित्र बुधवारी सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. दुधीवरे भागातील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यातील काही जण हे खासगी बोटीमधून धरणामध्ये फेरफटका मारायला गेले होते. दरम्यान, बोट उलटल्याने एक जण पाण्यामध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी घेतली असता ते दोघेही पाण्यामध्ये बुडाले.
हेही वाचा >>>लोणावळा नगर परिषदेकडून जलप्रदूषण! सांडपाणी थेट नद्यांत सोडल्याचा धक्कादायक प्रकार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक यांना शोध मोहिमेसाठी बोलवण्यात आले. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गुरुवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुसरा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सिताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा >>>चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरण; पोलीस अधिकाऱ्याने आरोपींना न्यायालयात ओळखले
‘लाईफ जॅकेट’विनाच पाण्यात?
पवना धरणाच्या जलाशयामध्ये दोन तरुण बुडून मयत झाल्याच्या घटनेला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. खासगी बोट घेऊन पाण्यात गेलेल्या तरुणांनी ‘लाईफ जॅकेट’ घातले नव्हते. बोट पाण्यामध्ये फिरवण्यासाठी परवानगी आहे का? पवना धरण परिसरामध्ये अशा किती खासगी बोट पाण्यात फिरत आहेत? जलसंपदा विभाग यावर काही कारवाई करते का?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या घटनेला दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.