पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सहा ते सात महिन्यांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या प्रकरणात पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. मात्र, चौकशीत दोषी आढळून आल्याने दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहेत.

या प्रकरणात ससून रुग्णालयामधील कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह १५ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने तब्बल ३१५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी बडतर्फ केलेल्या दोघांची नावे आहेत. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्या ठेवण्यात आला असून त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये नेल्यानंतर तिथून तो पळून गेला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, रुग्णालयातून ललित पाटील पळून गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.

हेही वाचा – छोटा राजनच्या नावाने धमकी प्रकरणात विशाल अगरवालला पोलीस कोठडी

हेही वाचा – लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स, टायगर पॉईंटवर जायचंय? ‘या’ वेळेत जा, अन्यथा होणार कारवाई

ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी नेले होते. तिथून तो पळून गेल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तब्बल तीन तास उशिराने देण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही पोलीस कर्मचारी ललित पाटील सोबत एक्स-रे काढण्यासाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आले असते. मात्र, या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळवल्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.