इंदापूर : अकोले-काझड (ता. इंदापूर) येथे निरा-भीमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात पडलेल्या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास या दोघांचे मृतदेहच बचाव कार्य पथकाच्या हाती लागले. अनिल बापूराव नरूटे (वय ३२) आणि रतिलाल बलभीम नरुटे (वय ५०) अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिद्धेश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत.
मराठवाड्याच्या सात अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या बोगद्यात हे दोघे बुधवारी पडले होते. काझड गावच्या हद्दीत नदी जोड प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाच्या ठिकाणी आपल्या कृषीपंपाची पाहणी करण्यासाठी दोराच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते. त्यावेळी दोर तुटून हे दोघेही बोगद्यामध्ये कोसळले गेले. हे दोघेही साधारण तीनशे फूट खोल कोसळले गेले होते. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – राज्यातील शाळांमध्ये आता ‘वाचन चळवळ’, शालेय शिक्षण विभागाची मान्यता
घटना समजताच आमदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बचावासाठी सर्व ती यंत्रणा उललब्ध करून देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. भरणे यांचे पुतणे अनिकेत भरणे, सचिन सपकळ, विजय काळे यासह अनेक मंडळी या ठिकाणी या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर आणि भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एका मोठ्या क्रेनच्या मदतीने काही माणसे या बोगद्यात उतरली आणि त्या दोघांचा शोध घेतला गेला. मात्र त्यांना वाचवण्यात सर्वांनाच अपयश आले. अखेर मध्यरात्री दोघांचे मृतदेह हाती लागले.