पिंपरी : काळेवाडीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन टोळक्यांनी कोयते मिरवत राडा घातला. रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली. नढेनगरमध्ये अल्पवयीन मुलांसह पाच जणांच्या सराईत गुन्हेगार असलेल्या टोळक्याने तीन रिक्षा, चार दुचाकींची तोडफोड करत तरुणाला लुटले. तर, डी-मार्टच्या वाहनतळामध्ये सात जणांच्या टोळक्याने कोयता आणि दगडाने तीन कारच्या काचा फोडल्या आणि एकाच्या खिशातून १४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नढेनगर येथील गुन्ह्यात आयुष सुनील खैरे (वय १८), हर्ष विनोद महाडिक (वय २०, दोघे रा. नढेनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सिद्धार्थ संजय जगताप (वय १९), आणि दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित प्रभाकर वाघमारे (वय २२, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी आयुष याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याची मुक्तता झाली होती. शनिवारी मध्यरात्री नढेनगरमधील शिवकृपा कॉलनी येथे आरोपी सिद्धार्थ, आयुष, हर्ष आणि त्यांचे दोन साथीदार कोयते, लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी कोयते आणि लाकडी दांडके हवेत फिरवत रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन रिक्षा आणि चार दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर रोहित वाघमारे यांच्या खिशातून जबरदस्तीने २ हजार १०० रुपये काढून घेतले. त्यांना धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केले.

हेही वाचा – दुर्मीळ पॅराथायरॉईड कर्करोगावर उपचार; निदान अन् शस्त्रक्रियेविषयी जाणून घ्या…

हेही वाचा – गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा

काळेवाडी येथील डी-मार्टच्या वाहनतळामध्ये घडलेल्या गुन्ह्यात शुभम अशोक तापकीर (वय २३, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र प्रकाश सावंत (वय ३७, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सावंत हे काळेवाडी येथील डी-मार्ट वाहनतळामध्ये थांबले होते. यावेळी एका कारमधून सातजण आले. त्यांनी कोयते आणि दगड मारून पार्किंगमधील तीन कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर सावंत यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातून १४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. वाहनतळामध्ये लोकांची गर्दी जमा झाली असता. आरोपींनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two gangs swinging sticks sickle vandalism of rickshaws two wheelers incident in kalewadi pune print news ggy 03 ssb