वाकड येथील शासकीय निवास्थानात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली. आरोपी सख्खेभाऊ असून सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी, रोकड असा २४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली. लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २८), सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २६, दोघे रा. वडनगर, म्हैसाना, गुजरात) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा >>> मासिक पाळी रक्त विक्री प्रकरण : अडीच वर्षे हेलपाटे मारूनही गुन्हा दाखल नाही, पीडितेच्या आरोपावर पोलीस म्हणाले…

कावेरीनगर वाकड येथील पोलीस वसाहतीतील शासकीय निवासस्थानातील २० क्रमाकांच्या इमारतीमधील ८ नंबरच्या सदनिकेत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी घरफोडी झाली होती. सहा लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरी झाली होती. या गुन्ह्याचा वाकड पोलीस तपास करत होते. सीसीटीव्ही फुटेज, रात्रीचे सापळे रचण्यात आले. घरफोडी करणारे चोरटे रावेत परिसरात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दुकाचीवरुन जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

आरोपी सतपालसिंग यांच्याकडील बॅगेमध्ये एक लोखंडी कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य सापडले. आरोपी दोघेही सख्खे भाऊ असल्याचे तपासात समोर आले. आरोपींवर गुजरात राज्यात घरफोडीचे १६ गुन्हे  दाखल आहेत. त्या प्रकरणांत ते फरार आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडीचे १५ आणि वाहन चोरीचा एक अशा १६ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्याकडून २४ लाख ६८ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे, रोकड, गुन्हा करताना वापरण्यासाठी चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.