पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार केल्याच्या दोन घटना विश्रामबाग आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन असून या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने लग्नासाठी विचारणा केली. त्यानंतर तिला एका भाड्याच्या खोलीवर नेत तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुण आणि त्याचे चार मित्र यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०१४ या दरम्यान हा प्रकार घडला आहे. संबंधित तरुणाने तरुणीशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्न करण्याचे भासवून तिला एका खोलीवर बोलावून घेतले. त्यानंतर  तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या मित्रांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून त्याला मदत केली. लग्नाची विचारणा केली असता आरोपीने तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करून लग्न करण्यास नकार दिला. तसेच आरोपींनी तरुणीला दूरध्वनीद्वारे ‘झाले ते कोणाला सांगू नको’ असे म्हणून जीव मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक एन. पेंढरकर पुढील तपास करत आहे.

हेही वाचा >>>विभक्त राहणाऱ्या पत्नीकडून पतीच्या घरी चोरी; पतीचे कपडे जाळणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल

‘तुझ्यासोबत लग्न करणार आहे’, असे सांगत प्रेमाचे नाटक करून मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संबंधित तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत लग्न जमूवून साखरपुडा केला आणि अल्पवयीन मुलीची फसवणूक केली. याबाबत पीडित मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.