पुणे : शहरात तीन ठिकाणी आग लागल्याची घटना बुधवारी घडली. मुंढव्यातील एका बंगल्यात स्वयंपाकघरात लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. मुंढव्यातील झगडे पार्क परिसरात संकल्प बंगल्यात दुपारी आग लागली. आगीत अंजली इश्वर सकट (वय ५८) आणि त्यांचा मुलगा जतिन (वय ३२) जखमी झाले. बंगल्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे आढळून आले. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत स्वयंपाकघरातील साहित्य जळाले. आगीत अंजली आणि त्यांचा मुलगा जतिन जखमी झाले. जवानांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, शौकत शेख तांडेल रणदिवे, जगताप, बिचकुले, कवडे, कांबळे यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मावळ: अजित पवारांचे विश्वासू पण, ठाकरे गटाची उमेदवारी; कोण आहेत संजोग वाघेरे?

उंड्री येथील होले वस्ती परिसरात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास एका भंगार माल दुकानाला आग लागली. आगीत भंगार माल जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जवानांनी आग आटोक्यात आणली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर सोलेस पार्क सोसायटीत रोहित्राला आग लागली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

खेड शिवापूर परिसरात कंपनीत आग

खेड शिवापूर परिसरात एका रंगाच्या कंपनीत आग लागल्याची घटना घडली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city pune print news rbk 25 zws