पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन रविवारी पुण्यात झाले. यासाठी पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील अनेक मुख्य रस्ते वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. यामुळे पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करण्यास पसंती दिली. मेट्रोची प्रवासी संख्या रविवारी एकाच दिवसात दुपटीने वाढून दोन लाखांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा >>> एक रुपयात पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी १०० ते २५० रुपयांची मागणी; ई-सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट?

सध्या मेट्रोची सेवा वनाझ ते रामवाडी आणि जिल्हा न्यायालय ते पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन मार्गांवर सुरू आहे. पालख्यांच्या आगमनामुळे दोन्ही शहरांतील अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यामुळे प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय बंद झाल्याने नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली. जून महिन्यात मेट्रोने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी १ लाख होती. मात्र, ३० जूनला ती दुपटीने वाढून १ लाख ९९ हजार ४३७ वर पोहोचली. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय मार्गावरील ८३ हजार ४२६ आणि वनाझ ते रामवाडी मार्गावरील १ लाख १६ हजार ११ प्रवाशांचा समावेश आहे. याच वेळी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न रविवारी १५ लाख रुपयांवरून वाढून २४ लाख रुपयांवर पोहोचले.

हेही वाचा >>> राज्यात घरगुती, औद्योगिक पाणीपट्टीत दहा टक्के वाढ ; अंमलबजावणी सुरू; शेतीसाठीच्या पाणीपट्टीला स्थगिती

महामेट्रोने पालखीच्या आगमनानिमित्त प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आधीपासूनच नियोजन केले होते. मेट्रोची सेवा पहाटे ६ ते रात्री १० या वेळेत सुरू असते. पालखी आगमनामुळे ही सेवा एक तासाने वाढवून रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यात आली. प्रवाशांनी मेट्रो सेवेला मोठा प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानकात सर्वाधिक १९ हजार ९१९ प्रवासी संख्येची नोंद झाली. त्या खालोखाल पुणे महापालिका स्थानक १८ हजार ७९, शिवाजीनगर स्थानक १७ हजार ४६, पुणे रेल्वे स्थानक १५ हजार ३७८ आणि रामवाडी स्थानकातून १४ हजार ७७० प्रवाशांनी प्रवास केला. जिल्हा न्यायालय स्थानकात ५१ हजार प्रवाशांनी त्यांची मार्गिका बदलली.

मेट्रोचा प्रवासी संख्येचा विक्रम

– ६ ऑगस्ट २०२३ – १ लाख ३१ हजार २७

– १५ ऑगस्ट २०२३ – १ लाख ६८ हजार १२

– ३० जून २०२४ – १ लाख ९९ हजार ४३७

सर्वाधिक गर्दीची स्थानके

– पिंपरी-चिंचवड महापालिका – १९ हजार ९१९

– पुणे महापालिका – १८ हजार ७९

– शिवाजीनगर – १७ हजार ४६

– पुणे रेल्वे स्थानक – १५ हजार ३७८ – रामवाडी – १४ हजार ७७०