हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी शिरुर तालुक्यातील पाबळ गावात पकडले. पोलिसांना पाहताच उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन पोलिसांनी ताब्यात घेतले. कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली.
हेही वाचा- “राज्यात गद्दारी करून आलेल्या सरकारला घरी बसवण्याचं काम शिक्षकांनी केलं”; अजित पवारांची टीका
कोयता गँगचा म्होरक्या स्वप्नील उर्फ बिट्ट्या संजय कुचेकर (वय २२ रा. मांजरी, हडपसर), पंकज गोरख वाघमारे (वय २८, रा. बंटर स्कुलजवळ, हडपसर), सत्यम विष्णू भोसले (रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३ जानेवारी रोजी मांजरी परिसरात दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. पोलिसांना ते गुंगारा देत होता. दोघे जण शिरुर तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांच्या पथकाला मिळाली.
हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडी, भाजपा आणि अपक्ष उमेदवाराने फोडला प्रचाराचा नारळ
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी निखिल पवार, समीर पांडुळे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ पाबळला गेले. पोलिसांना पाहताच उसाच्या शेतातून कुचेकर आणि वाघमारे पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. दरम्यान, कोयता गँगमधील सत्यम भोसलेला पोलिसांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून अटक केली. पोलीस कर्मचारी चंद्रकात रेजीतवाड आणि अजित मदने यांनी ही कारवाई केली.