कर्ज देण्याचे आमिष दाखवून एकाकडून पंचेचाळीस हजार रुपये उकळणाऱ्या भामटय़ाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने हडपसर परिसरातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सतीश मोरे (वय ४२, रा. कोथरुड) यांनी यासंदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एप्रिल महिन्यात मोरे यांच्या मोबाईलवर एका भामटय़ाने संपर्क साधला. एका बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून भामटय़ाने मोरे यांना कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. भामटय़ाने दाखवलेल्या आमिषाला मोरे बळी पडले. त्यानंतर भामटय़ाने त्यांना विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका बँकेत पंचेचाळीस हजार रुपये भरण्यास सांगितले.
भामटय़ाने सांगितल्यानुसार त्यांनी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर त्यांनी भामटय़ाच्या मोबाईल क्र मांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल क्रमांक बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. ए. मोरे तपास करत आहेत.
दरम्यान, हडपसर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला घराच्या छतावर मोबाईल कंपनीचा मनोरा बसविण्याचे आमिष दाखवून त्याची ८३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुणाल पाटील (वय २५) याने यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी पाटील यांनी एका वृत्तपत्रात मोबाईल मनोरा बसवा आणि दरमहा आकर्षक पैसे मिळवा, अशा आशयाची जाहिरात वाचली होती. पाटील यांनी त्यानुसार जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. भामटय़ांनी त्यांना आमिष दाखवून एका बँकेच्या खात्यात ८३ हजार रुपये भरण्यास सांगितले. पाटील याने वेळोवेळी त्या खात्यात पैसे भरले. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाटील याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाडवी तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा