पिंपरी : पावसाळा संपून दाेन महिने झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवडकरांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर ३०६ खड्डे अद्यापही आहेत. आतापर्यंत ५९४० खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरात यंदा जूनअखेर पावसाला सुरुवात झाली होती. जून, जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. पावसाळ्यात शहराच्या विविध भागांत ६२४६ खड्डे पडले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा सर्वाधिक खड्डे असल्याची कबुलीही महापालिका प्रशासनाने दिली होती. मात्र, अद्यापही शहरातील भोसरी एमआयडीसी, चिखली, जाधववाडी, देहू रस्ता, चिंचवड, निगडीसह काही भागांतील रस्त्यावर खड्डे आहेत. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतुकीला संथ गती येत आहे. कोंडीत भर पडत आहे.

हेही वाचा…आमदार होताच बापूसाहेब पठारेंनी घेतली आयुक्तांची भेट, केली ‘ ही ‘ मागणी

महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने २८५४, खडीने ४२८, पेव्हिंग ब्लॉकने २०६३, सिमेंट काँक्रिटने ५७८ असे ५९४० खड्डे पूर्ण बुजविले आहेत. शहराच्या विविध भागांतील ३०६ खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित

शहरात दोन हजार किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. रस्ते तयार करण्यात आल्यावर वर्षभरात खड्डे पडल्यास कंत्राटदार, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

हेही वाचा…बंद होणारी स्मार्ट सिटी सुरु राहणार, नक्की काय आहे प्रकार!‘एटीएमएस’ यंत्रणेची जबाबदारी घेण्याची ‘स्मार्ट सिटी’ची तयारी; महापालिकेला पाठविले पत्र

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ मुरूम, खडी आणि सिमेंट काँक्रिटने बुजविले जातात. आता पावसाळा संपला असून सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येईल. त्यानंतर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना मुदत दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two months after end of monsoon people of pimpri chinchwad have to travel through pit pune print news ggy 03 sud 02