अजमेरमधील एटीएम केंद्रातून रोकड काढली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ला प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून मीरा रोड भागातून  दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांनी बनावट डेबिट कार्डचा वापर करून ७ लाख ५० हजारांची रोकड राजस्थानातील अजमेर शहरातून काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

रफिक जलाल अन्सारी (वय ३४), अब्दुला अफसर अली  शेख (वय २८, दोघे रा. मीरा रोड, जि. ठाणे ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कॉसमॉस बँकेच्या सव्‍‌र्हरवर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाखांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. बनावट डेबिट कार्डचा वापर करून ही रोकड काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मुंबई, कोल्हापूर, इंदूर शहरातील विविध एटीएम केंद्रांतून रोकड काढल्याप्रकरणी यापूर्वी सायबर गुन्हे शाखेकडून सातजणांना अटक करण्यात आली होती. कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले अन्सारी, शेख मीरा रोड भागातील एका गॅरेजमध्ये काम करतात. दोघांनी अजमेर येथील एटीएम केंद्रातून दहा बनावट कार्डचा वापर करून साडेसात लाखांची रोकड लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी काहीजणांना येत्या काही दिवसांत अटक होण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more accused in the cosmos cyber attack case
Show comments