पुणे : राजस्थानवरून ईशान्येकडे जाणारा थंड वाऱ्याचा झोत आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा संयोग विदर्भात होत असल्यामुळे दोन दिवस गारपीट होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानवरून ईशान्येकडे थंड वाऱ्याचा झोत जात आहे. मध्य भारतासह विदर्भात हा झोत वातावरणाच्या खालच्या स्तरात आला आहे. मध्य राजस्थानमध्ये वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली असून, तिथून वाऱ्याची एक द्रोणिका रेषा कर्नाटकपर्यंत तयार झाली आहे. ही रेषा मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून जाते. बंगालच्या उपसागरात वाऱ्याच्या प्रति चक्रवाताची स्थिती तयार झाली असून, बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त उष्ण वारे राज्यात येत आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे विदर्भात आणखी दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवगळता राज्याच्या अन्य भागात शनिवारपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
खान्देश, मराठवाडा व विदर्भातील एकूण २२ जिल्ह्यांत शनिवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडू शकतो. प्रामुख्याने जळगाव, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होऊ शकते. मुंबईसह कोकणात वातावरण कोरडे राहून कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दीड अंशाने वाढू शकेल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.