पुणे : कात्रज भागातील दत्तनगर परिसरात भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याचे माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्याची ओळख पटलेली नाही.
विलास जयवंत बांदल (वय ५२, रा.त्रिमुर्ती रेसिडन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) असे खून झालेल्याभाजी विक्रेत्याचे नाव आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात बांदल यांचा खून भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून दोघांनी केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा : पिरंगुट घाटात खासगी बसला आग
लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गौतम घनश्याम तुरुपमारे (वय ३६, रा. पर्वती ) याला पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ असलेल्या भुयारी मार्गात भिक्षेकरी आसरा घेतात. भुयारी मार्गात काहीजण अमली पदार्थांचे सेवन करतात. अमली पदार्थांची नशा करताना झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी गौतम मजूरी करतो. तो फिरस्ता असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. —