लोणावळ्यामध्ये तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण मूळ नेपाळचे असून त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा शिवदुर्ग टीमने अवघ्या काही तासांतच त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. विवेक छत्री आणि करण कुंवर अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक आणि करण हे रविवारी इतर एका मित्रासह लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. तिघेही लोणावळ्यातील लेकजवळ पोहण्यासाठी गेले. विवेक आणि करण पोहण्यासाठी तलावात उतरले. परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघेही बुडाले. या घटनेची माहिती तिसऱ्या मित्राने पोलिसांना दिली. पोलीस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोहोचली. स्कुबा डायव्हिंगच्या साह्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आलं. दोन्ही तरुण हे नेपाळचे असून त्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये एकापाठोपाठ तीन पेक्षा अधिक स्फोट; आगीमध्ये तीन ते चार बस जळून खाक !
लोणावळा परिसरात पाऊस चांगला झाला असल्याने तलाव भरलेले आहेत. तलावाची माहिती असेल तरच पाण्यात उतरावे असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे. शिवदुर्ग टीमच्या पथकाने मृतदेहाचा शोध घेतला. अजय शेलार, महेश मसने, सागर कुंभार, मनोहर ढाकोल, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड़, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशू तिवारी,वैभव दुर्गे, अशी पथकातील सदस्यांची नावे आहेत.