जमिनीच्या वादातून दोन भाच्यांचा खून करणाऱ्या आत्याला आणि तिच्यासोबत एकूण दहा जणांना पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष के. कऱ्हाळे यांनी हा निकाल दिला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे असलेल्या बहिरवाडीतील भैरवनाथ मंदिराच्या आवारात ७ मे २०१२ ला रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी चिनकी भगतचा मारूती आणि बाजीराव या दोघांशी वाद झाला. हे दोघेही तिचे भाचे आहेत. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात जी जमीन आहे त्यावरून हा वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आत्यासह दहाजणांनी बाजीराव आणि मारूती या दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांनाही सासवडमधल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आत्यासह दहाजणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष. के. कर्हाळे यांनी खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार , वैद्यकीय अहवालानुसार दहा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
खून झालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे :
१) बाजीराव बाळू पांगसे (वय-30)
२)मारुती बाळू पांगसे (वय-26, दोघेही रा. आतकरवाडी)
आरोपींची नावे खालील प्रमाणे :
१) नामदेव दगडु भगत (वय-62)
२)चिनकी नामदेव भगत (वय-52)
३)ज्ञानदेव नामदेव भगत (वय-31)
४)श्रीनाथ नामदेव भगत (वय-29 चौघेही रा.बहिरवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
५) मयूर दिलीप भेलके (वय-25, रा. भोई आळी, भोर)
६)समीर गुलाब किवळे (वय-25, रा. भेलकेआळी, भोर)
७)आदर्श चंद्रकांत सागळे (वय-26, नवी आळी, भोर)
८) शरीफ हनिफ आतार (वय-25, रा. पावगेचाळ, नागोबा आळी, ता. भोर, जि. पुणे)
९) श्रीकांत शांताराम सणस (वय-26, रा. भोरेश्वरनगर, भोर)
१०)अनिकेत संपत मोरे (वय-25, भेलकेआळी,भोर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.