पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोन परिचारिका दोषी आढळल्या आहेत. त्यांना तत्काळ निलंबित करण्याची कारवाई जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी केली. या प्रकरणी सार्वजनिक विभागाकडे कारवाईचा अहवाल त्यांनी मान्यतेसाठी पाठवला आहे.
या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत याबाबतचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून मागविण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी प्रकरणी चौकशी केली. त्यात दोषी आढळलेल्या परिचारिका प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर यांना मंगळवारी तत्काळ निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कालावधीत ठोकळ यांना शिरूर येथील ग्रामीण रुग्णालय आणि मकलूर यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांची आता विभागीय चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यांच्या अंतिम कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.
हेही वाचा >>>धुळवडीला १४२ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात; नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांवर कारवाई
औंध जिल्हा रुग्णालयात दाखल दोन रुग्णांना २३ मार्चला दुपारी चार वाजता चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण करण्यात आले. ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या रुग्णाला ‘बी’ रक्तगटाचे आणि ‘बी’ रक्तगटाच्या रुग्णाला ‘ए’ रक्तगटाचे रक्त देण्यात आले. त्यानंतर या दोन्ही रुग्णांची प्रकृती बिघडली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून, त्यांचे वय ७० व ५४ वर्षे आहे. परिचारिका रक्त संक्रमण करीत असताना मोबाइलवर बोलत होती, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नातेवाइकांनी केली होती.
जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी दोन परिचारिकांना निलंबित करून तो अहवाल मंजुरीसाठी माझ्याकडे पाठविला आहे, असे आरोग्य विभागाचे सहसंचालक -डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.