लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळात तीन मंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, अशी पदे भूषविणाऱ्या पुण्यातील राजकीय पक्षांच्या मंडळींना पुणे महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यासाठी अधिकारी मिळत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची तीनपैकी दोन पदे रिक्त आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात एप्रिल २०२४ मध्ये एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्तांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांच्या जागेवर महापालिका आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भोसले यांची तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागांपैकी एका जागेवर पृथ्वीराज बी. पी. यांची नेमणूक झाली. मात्र, उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडेच महापालिकेच्या सर्वच विभागांचा कारभार आहे. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे सध्या मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभार देखील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

आणखी वाचा-इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

राज्याच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ हे पुणे शहराचा कारभार पाहतात. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे देखील पुण्याचे आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारच्या स्तरावर पुण्याचे राजकीय वजन अधिक असतानाही महापालिकेला मात्र अतिरिक्त आयुक्त म्हणून एकही अधिकारी मिळत नसल्याची चर्चा महापालिकेत आहे.

महापालिकेत रिक्त असलेली अतिरिक्त आयुक्तांची पदे तातडीने भरावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. लवकरच दोन अधिकारी महापालिकेला मिळतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two out of three additional commissioner posts in pune municipal corporation have been vacant for nine months pune print news ccm 82 mrj