पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नजीकच्या स्थानकांवरून गाड्या वळविण्यात येत आहेत. पुणे-सोलापूर गाडी हडपसर टर्मिनल येथून सोडण्यात येणार असून, दौंड-पुणे गाडी हडपसरपर्यंत धावणार आहे. हा बदल ६ मार्चपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा >>> होलिका दहन सोमवारी की मंगळवारी?
पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे सुरु होणार आहे. या कामासाठी सुमारे २९० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकात काम सुरू केल्यानंतर शिवाजीनगर, खडकी, हडपसर येथून काही गाड्या सोडाव्या लागणार आहेत. शिवाजीनगर स्थानक येथे नुकतीच लोकलसाठी स्वतंत्र लाइन तयार करण्यात आली आहे. आता हडपसर टर्मिनलमधून गाड्या सोडल्या जाणार आहेत.
हेही वाचा >>> पुणे : पुढील शैक्षणिक वर्षापासून तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने
हडपसर टर्मिनलमधून सध्या हैदराबाद एक्स्प्रेस ही एकमेव गाडी सुटते. पुणे स्थानकात काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर आणि हडपसर या दोन टर्मिनलचा वापर रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. त्या दृष्टीने रेल्वेने पावले उचलली आहेत. हडपसर रेल्वे टर्मिनल येथून गाड्या वाढविण्यास सुरूवात झाली आहे. तिथे प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा असून, त्या देण्यासाठीही पावले उचलली जाणार आहेत. पुणे-सोलापूर गाडी आता हडपसर टर्मिनलवरून सकाळी ८.३५ वाजता सुटेल. दौंड-पुणे ही गाडी हडपसरपर्यंत धावेल. तिचे हडपसर टर्मिनलवर सकाळी ७.३५ वाजता आगमन होईल. दरम्यान, पुणे-फलटण या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ६.१० वाजता सुटेल आणि फलटणला सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल, असे रेल्वेने कळवले आहे.