पुणे: बिबवेवाडी परिसरात झालेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. शरीरसंंबंधास विरोध केल्याने दोघांनी महिलेचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
रवीसिंग राजकुमार चितोडीया (वय २९, रा. येवलेवाडी, मूळ. रा. नाशिक), विजय मारूती पाटील (वय ३२, रा. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शनिवारी (९ डिसेंबर) सकाळी गंगाधाम ते बिबवेवाडी रस्त्यावर गोयल गार्डनसमोर मोकळ्या जागेत तंबूजवळ महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने प्रहार करण्यात आले होते. महिलेची ओळख पटलेली नव्हती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले. गंगाधाम रस्त्यावरुन आरोपी चितोडिया आणि पाटील चाकणकडे गेले होते. चित्रीकरणात त्यांच्या संशयास्पद हालचाली टिपण्यात आल्या होत्या. तांत्रिक पडताळणीत चितोडिया आणि पाटील यांनी महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा… कापूरहोळ-सासवड रस्त्यावर भीषण अपघात; दोन वर्षांचे बालक बचावले… पण आईसह मोटारचालकाचा मृत्यू
आरोपी शनिवारी रात्री गंगाधाम रस्त्यावर आले होते. दोघे दारु प्यायले होते. तेथील तंबूजबळ महिला झोपली होती. दोघांनी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यांना विरोध केला. तेव्हा दोघांनी महिलेच्या डोक्यात गज मारला. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दोघेजण पसार झाले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, हवालदार अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे आदींनी ही कारवाई केली.