सोसायटीतील मलनि:सारण टाकीची सफाई करणारे तीन कामगार टाकीत गुदमरुन मृत्युमुखी पडले. वाघोलीतील सोलासिया सोसायटीच्या आवरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नितीन प्रभाकर गोंड (वय ४५, रा. बुलढाणा) , सतिशकुमार चौधरी (वय ३५, रा. उत्तर प्रदेश), गणेश पालेकराव (वय २८, रा. नांदेड) अशी गुदमरुन मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. गजानन कुरमभट्टी हे ठेकेदार आहेत. वाघोलीतील सोलासिया सोसायटीच्या आवरातील मलनिस्सारण टाकीची (सेफ्टी टँक) सफाई करण्याचे काम सकाळी सातच्या सुमारास सुरू होते. त्या वेळी उतरलेले कामगार बाहेर आले नाही. कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती रहिवाशांनी वाघोलीतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन केंद्रास कळविली.

अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन. नितीन माने, संदीप शेळके, जवान चेतन खमसे , मयूर गोसावी , तेजस डांगरे , विकास पालवे, अभिजीत दराडे ,अक्षय बागल यांनी तिघांना टाकीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून तपास करण्यात येत असून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.