लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंतू रामबाबू राय (वय ३० ,रा. कव्वा चौक, जोरपूर, जि. समस्तीपूर, बिहार), राकेशकुमार रामनाथ दास (वय १९, रा. खुसरुपूर, जि. पाटणा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्सल विभागाजवळ दोघे जण थांबले असून ते गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली.
हेही वाचा… धक्कादायक! किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण; मुलाने नव्हे तर वडिलांनी…
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून राय आणि दास यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. दोघांकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा, मोबाइल संच, पिशवी असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने संगणक अभियंत्याला गंडा
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, योगेश मांढरे, संतोष देशपांडे, प्रशांत बोमदंडी आदींनी ही कारवाई केली.