आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर दौंडजजवळ अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांच्यात अपघात होवून दुचाकी गाडीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक गाडीसह पळून गेला. या अपघातात अमोल विठ्ठल दगडे (वय ३८, मूळ गाव दौंडज सध्या रा.मावडी क.प, ता. पुरंदर) व दिग्विजय यशवंत कोलते (वय ३४ रा.पिसर्वे, ता.पुरंदर जि पुणे ) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  रविवारी (दि.२३) दुपारी  चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अमोल दगडे व दिग्विजय कोलते हे दोघे जण दौंडजहून जेजुरीकडे येत होते, यावेळी समोरून येणारे अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला .अपघातानंतर अपघात स्थळी न थांबता गाडी चालक गाडीसह पळून गेला.या अपघात प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे अधिक तपास करीत आहेत.

आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग विकसित होत असताना  शिवरी ते नीरा मार्गावर अनेक लहान – मोठे अपघात होवून गेल्या दोन महिन्यात  सात ते आठ जणांचा बळी गेला आहे. रस्ता मोठा झाल्याने वाहने वेगात जातात. महामार्गावर असलेल्या प्रत्येक गावांच्या चौकात रबलिंग स्पीड ब्रेकर,सिग्नल,झेब्रा क्रॉसिंग पट्टे बसवावेत अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.  परंतु याकडे कोणी गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. अद्यापी ही कामे प्रलंबित आहेत. रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी कामे वेगात सुरू आहेत , परंतु अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना होण्याची गरज आहे .पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सतत होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Story img Loader