पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एका स्वीटमार्टच्या मालकाने काजूकतली फुकट दिली नाही म्हणून, दोघांनी स्वीटमार्टच्या मालकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल देखील जप्त केले आहे. सुरज मुंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे फुलपरी स्वीटमार्ट आहे. तिथे सोमवारी दोन तरुण आले आणि त्यांनी एक किलो काजूकतली घेतली. त्यावर दुकानदाराने मालाचे पैसे मागितल्यावर दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी दुकानदारावर गावठी पिस्तूलामधून दोन वेळा गोळी मारण्याचा प्रयत्न केला पण, गोळी काही बाहेर आली नाही.
हेही वाचा: पुणे: श्वानांच्या भांडणावरुन मालकांमध्ये जुंपली; श्वानाच्या पट्ट्याने एकास बेदम मारहाण
ती गोळी दुकानातच पडली आणि आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. त्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर काही तासांतच आरोपी सुरज मुंडे आणि एका अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले.