पिंपरी चिंचवडमध्ये दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत स्लॅबला पाणी देत असताना पाय घसरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीन च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दिनांक १५ एप्रिल रोजी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. सुषमा श्याम कांबळे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सुषमा ही रागीट स्वभावाची होती त्यातूनच ही घटना घडल्याची फिर्याद सुषमाच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. १५ एप्रिल रोजी ही घटना घडली होती, विषारी औषध घेतल्याने सुषमावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आठ दिवसांनंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत चिखली गावठाण येथील स्वतःच्या बांधकामवरील स्लॅबला पाणी देत असताना चौथ्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडल्याने ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. विजय मोरे यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चिखली येथे साडेतीन गुंठ्यात मोरे यांनी चार मजली इमारत बांधत होते. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. स्लॅबला पाणी देत असताना हा अपघात झाला. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.