लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या स्वारगेट वाहतूक विभागातील बाळू दादा येडे व गौरव रमेश उभे अशा दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका नागरिकाने हे दोघेजण वाहनचालकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ ट्विट करून पुणे शहर वाहतूक पोलीस या ट्विटर खात्यावर टॅग केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या दोघांचे तडकाफडकी निलंबन केले.

येडे आणि उभे या दोघांची नेमणूक स्वारगेट वाहतूक विभागात आहेत. बुधवारी (१७ मे) सकाळी दहा ते पावणेअकराच्या सुमारास हे दोघे गंगाधाम आई-माता मंदीर रस्ता येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी ते वाहनचालकांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ असे लिहून पाच व्हिडीओ एका व्यक्तीने पोलिसांच्या ट्विटरला टॅग केले होते.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/connstable-viral-video.mp4
Viral Video

हेही वाचा… पुणे : बैलगाडा शर्यतीचा मार्ग खुला; श्रेयवादावरून खासदार कोल्हे आणि आमदार लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर!

हा प्रकार निदर्शनास येताच वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. त्यावेळी या दोघांनी संबंधित वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे सदृश्य स्वीकारताना दिसून आले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवत दोघांना निलंबीत करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two police constables suspended for extorting money from motorists pune print news vvk10 dvr