पुणे : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकाकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
याप्रकरणी सहायक फौजदार सुनील तुळशीदास मगर (वय ५५), पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर (वय ३४) यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा…शिक्षक दिन विशेष : विद्यार्थीच झाले विद्यार्थ्यांचे शिक्षक… कुठे आहे ही अनोखी शाळा?
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस फौजदार मगर आणि गाडेकर यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत तपास अधिकारी मगर याने तक्रारदाराकडे ३५ हजार रुपये मागितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर बुधवारी सायंकाळी वडगाव मावळ पोलीस ठाण्याजवळ सापळा लावण्यात आला.
हे ही वाचा…कोंढव्यातील बनावट दूरध्वनी केंद्र आठ वर्षांपासून – दहशतवाद विरोधी पथकाकडून तिघे अटकेत
तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या मगर आणि गाडेकर यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली.