पुणे : सातारा-सांगली रेल्वे मार्गावरील दोन फाटक दुरुस्तीच्या कामामुळे काही वेळ बंद राहणार आहेत. यामुळे या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात येणार आहे.
पुणे रेल्वे विभागातील सातारा-सांगली रेल्वे मार्गावरील नांद्रे-सांगली स्थानकांदरम्यान असलेले फाटक क्रमांक १२६ हे ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत तेथील भुयारी मार्ग रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल. याचबरोबर भिलवडी-नांद्रे स्थानकादरम्यान असलेले रेल्वे फाटक क्रमांक ११९ हे ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १० मेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पाचवा मैल-भिलवडी स्टेशन-चितळे डेअरी-पाटील मळा-वसगडे असा उपलब्ध असेल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
पुणे ते मुझफ्फरपूर उन्हाळी विशेष गाड्या
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष १ जुलैपर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी दर सोमवारी पुण्याहून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.३५ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना,प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर हे थांबे आहेत.