पिंपरी : चिखली येथील दोन रबर कंपन्या आगीत भस्मसात झाल्या. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.चिखली-पवार वस्ती येथे वीरभ सस्पेंशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पाच हजार चौरस फुटामध्ये तीन शेड आहेत. आर. के. ट्रेडर्स या कंपनीचे दोन हजार चौरस फुटामध्ये एक शेड आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये रबरपासून विविध प्रकारची साधने बनवली जातात. गुरुवारी सकाळी वीरभ सस्पेंशन कंपनीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका मुख्य अग्निशमन केंद्रासह चिखली, तळवडे, प्राधिकरण, पिंपरी, थेरगाव, मोशी अग्निशमन केंद्राचे ११ बंब घटनास्थळी दाखल झाले. ५९ जवानांनी दुपारी साडेबारापर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र, रबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग धुमसत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून अग्निशमन बंब तैनात ठेवले होते. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नोटीस बजावूनही दुर्लक्ष
महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून व्यवसाय अग्नी सुरक्षितता सर्वेक्षणामध्ये या दोन्ही कंपन्यांना दोन वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षिततेची पूर्तता केली नसल्याचे दिसून आले आहे. अग्नी सुरक्षितता नियमांचे पालन न केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाईची शक्यता आहे.