वाहिनीवरून शाळेत पोहोचण्याची कसरत विद्यार्थिनींच्या जीवावर बेतली

हडपसर भागातील साडेसतरा नळी भागात असलेल्या कालव्यावरील वाहिनीवरून चालत कालवा ओलांडणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. अवघ्या सहा इंच व्यासाच्या दोन वाहिनीवरून चालत कालवा ओलांडून शाळेत पोहोचण्याची कसरत साडेसतरा नळी भागातील विद्यार्थी करत आहेत. शाळेत पोहोचण्याचा जवळचा मार्ग म्हणून या भागातील शाळकरी मुले रोज वाहिनीचा वापर करत आहेत. ही कसरत शाळकरी मुलांच्या जिवावर बेतल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

[jwplayer 8cIf7m5X]

हडपसर येथील साडेसतरा नळी भागातील बिराजदार फाटा येथे राहणाऱ्या विद्या बद्रे (वय १३) आणि वैष्णवी बिराजदार (वय १३) या विद्यार्थिनी गेल्या मंगळवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी शाळेत निघाल्या होत्या. या भागात असलेल्या लोखंडी वाहिनीवरून त्या कालवा ओलांडत असताना तोल जाऊन दोघी पाण्यात पडल्या. कालव्यातील पाण्यात पडल्यानंतर दोघी बुडाल्याची घटना बुधवारी (१६ नोव्हेंबर) उघडकीस आली होती. शाळकरी मुली बुडाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात या अपघाताची चर्चा होती.

मुले बऱ्याचदा कालवा ओलांडताना वाहिनीचा वापर करतात. वाहिनीवरून चालत शाळेत जाणे हा मुलांना साहसी खेळ वाटतो. मात्र ही कसरत मुलांच्या जिवावर बेतल्याचे तेथील ग्रामस्थांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कालव्याचा हा भाग पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित येतो. तेथील कर्मचाऱ्यांनी तेथे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे पाहून विद्यार्थी येथून जातात.

कालवा ओलांडण्यासाठी पूल

जुना कालवा ओलांडण्यासाठी कालव्यावर डीपी रस्ता, सिरम इन्स्टिटय़ूटनजीक, साधू नाना वस्ती, जुना लोखंडी पूल आणि साडेसतरानळी येथे पूल आहेत. मात्र, अनेकजण विशेषत: शाळकरी मुले कालवा ओलांडण्यासाठी पाईपचा वापर करतात. दुपारी बारा ते चार या वेळेत या भागात फारशी गर्दी नसते. मात्र, सकाळी आणि सायंकाळी या भागात गर्दी असते. साडेसतरा नळी भागातील पुलावरून चारचाकी वाहनेदेखील जातात.

[jwplayer OnydZc5l]

Story img Loader