पुणे : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध खडकी आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. खडकी आणि स्वारगेट परिसरात या घटना घडल्या.

खडकी पोलिसांकडून आसनीन माजीद कुरेशी (वय २०) आफान रियाज चौधरी (वय २१), कामरान इसाक अन्सारी (वय १९) , आरसलान महरुफ चौधरी (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाम नंदाराम काची (वय ४९, रा. गाडी अड्डा, खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. मौलाना आझाद फाऊंडेशनकडून शनिवारी खडकी बाजार परिसरात मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी मंडळाचे पदाधिकारी कुरेशी, चौधरी, अन्सारी आणि साथीदारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या. नितेश राणे यांचा निषेध करून त्यांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पॅलेस्टाईन झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करत आहेत.

हे ही वाचा…पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

स्वारगेट पोलीस ठाण्यात १०० ते १२५ जणांवर गु्न्हा

धार्मिक तेढ निर्माण करुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय सोनवणे, राहुल खुडे, हेमंत गायकवाड ,मंगेश पवार, अक्षय ढावरे, बापू खुडे, उज्वला गौड, गणेश शेरला यांच्यासह १०० ते १२५ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत कासेवाडी भागात एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. शुक्रवारी (२० सप्टेंबर) स्वारगेट पोलीस ठाण्यात जमाव आला. आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करून घोषणाबाजी केली. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करत आहेत.