पिंपरी :  गुगल वरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते शोधून चोरी करण्यासाठी बस, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करायचा आणि चोरी करण्यासाठी जाताना मोबाइल फोन बंद ठेवणार्‍या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने अटक केले. त्यांच्याकडून दोन लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सलीम सिकंदर शेख (वय ५८), अजित अर्जुन पिलई (वय ४२, दोघे रा. वांगणी गोरेगाव, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल रोजी काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील व्यावसायिक कार्यालयामध्ये चोरीची घटना घडली.कार्यालयामधून ३६ हजार रुपये चोरीला गेले होते. घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने भेट दिली.

११ दिवसात तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून संशयित आरोपींची माहिती काढली. २० एप्रिल रोजी रात्री काळेवाडी येथे दोघे संशयित पायी जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सलीम आणि अजित या दोघांकडून दोन लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी सराईत आहेत. सलीम  याच्या विरोधात मुंबई शहर येथे घरफोडीचे ६२ गुन्हे दाखल आहेत. तसेच, मुंबई शहर येथे त्याच्यावर १० ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जारी करण्यात आले आहेत. तर, अजित याच्या विरोधात २० गुन्हे दाखल आहेत.

आरोपी ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील असून ते पिंपरी-चिंचवड शहरात बसने चोरी करण्यासाठी येत असत. अजित हा उच्चशिक्षित असून तो गुगल वरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते शोधत असे. बसमधून उतरल्यानंतर चोरी करण्याच्या ठिकाणी ते ऑटो रिक्षाने जात असत. तसेच चोरी करण्यासाठी येताना ते मोबाईल फोनचा देखील वापर करत नसत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, नागेश माळी, पोपट हुलगे, ननावरे, कारके यांनी केली.