पुणे : डोंबविली येथील सराफ कारागिराकडील तब्बल ३४ लाख रुपयांचे दागिने खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करताना दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजापूर ते मुंबई प्रवास करताना ही घटना घडली असून, पाठीमागच्या आसनावर बसलेल्या दोघांनी ते चोरल्याचा संशय आहे. याप्रकरणी भेहराराम कुमावत (वय ४४, रा. डोंबिवली ईस्ट) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेहराराम कुमावत हे डोंबिवली ईस्ट परिसरात सराफी कारागीर म्हणून काम करतात. येथे दागिने तयार केल्यानंतर ते विजापूर येथील काही सराफांना विक्री करतात. गेल्या दीड वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. दरम्यान, ते दागिने घेऊन विजापूर येथे गेले होते. काही दागिन्यांची विक्री केली. उर्वरित ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने आणि १ लाख १२ हजार रुपयांची रोकड घेऊन ते विजापूरहून खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईकडे परतत होते.

बसमध्ये त्यांच्या पाठीमागील आसनावर दोन व्यक्ती बसल्या होत्या. बस हडपसर टोल नाक्याजवळील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ आल्यानंतर लघुशंकेसाठी थांबविण्यात आली होती. तेव्हा काही प्रवाशांसमवेत तक्रारदार खाली उतरले होते. ते परत आले, तेव्हा त्यांना बॅगेतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे लक्षात आले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी संबंधित सराफाला याची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना प्रथम तक्रारीत तथ्य आढळले नव्हते. परंतु, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तेव्हा पाठीमागे बसलेले पॅसेंजर द्राक्ष केंद्रापासूनच गायब झाल्याचे लक्षात आले. तसेच, त्यांचे मोबाईल देखील घटनेनंतर बंद झाल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले आहे. आता पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

Story img Loader