पुणे : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर शुक्रवारपासून (ता.१९) पेट्रोल पंपचालकांची डोकदुखी वाढली आहे. पंपांवर दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण नेहमीपेक्षा दुपटीने वाढले आहे. यामुळे अनेक पंपचालकांनी सुटे पैसे नसल्याचे फलक सोमवारी लावले.
रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासूनच पंपावर ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले. काही ग्राहक तर किरकोळ शंभर अथवा दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून दोन हजारांची नोट देत आहेत. अशा ग्राहकांना सुटे पैसे देण्याची अडचण पंपचालकांसमोर उभी राहिली आहे. यामुळे अनेक पंपचालकांनी किमान पाचशे अथवा हजार रुपयांचे पेट्रोल भरले तरच दोन हजारांची नोट स्वीकारली जाईल, असे फलक लावले आहेत. सुटे पैसे नसल्याने दोन हजारांची नोट स्वीकारली जाणार नाही, असे थेट फलकही काही पंपांवर लावण्यात आले आहेत.
हेही वाचा – “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टता नाही
रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर केले आहे. पंपचालकांकडून त्या दिवशी जमा झालेली रक्कम दुसऱ्या दिवशी बँकेत भरली जाते. विशेष म्हणजे, ३० सप्टेंबरला शनिवार असून, दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरला जमा झालेल्या दोन हजारांच्या नोटा पंपचालकांना थेट ३ ऑक्टोबरला बँकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. कारण २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त बँकांना सुटी असणार आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबरला नोटा बँकांमध्ये जमा करता येणार की नाही, याबाबत रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी केली.
शंभर अथवा दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून ग्राहक दोन हजारांची नोटा देत आहेत. यामुळे नेहमीच्या तुलनेत पंपांवर दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण २० ते २५ टक्के वाढले आहे. या नोटा वाढल्याने सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली आहे. – ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे</p>
हेही वाचा – शरद पवारांचं राहुल गांधींबाबत मोठं विधान; म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे…!”
पेट्रोल पंपांवर दिवसाला दोन हजारांच्या सरासरी १५ ते २० नोटा येत होत्या. आता त्यांची संख्या ४० ते ५० झाली असून, पंपांवर फारसा परिणाम झालेला नाही. पंपचालकाने दोन हजारांची नोट स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याची तक्रार आमच्याकडे करा. – अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन