लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या शांतता फेरीसाठी शहर परिसरात दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे वाहतूक सुरळीत पार पडली.

मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या शांतता फेरीसाठी शहर परिसरात पोलिसांनी रविवारी सकाळपासून बंदोबस्त तैनात केला होता. शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने पोलिसांनी आठवडाभरापासून नियोजन केले होते. फेरीचा मार्ग, तसेच वाहतूक बदल, पर्यायी मार्ग पोलिसांकडून निश्चित करण्यात आले होते.

आणखी वाचा-किंमती वाढूनही मोठ्या घरांना ग्राहकांची पसंती! तुमच्या शहरातील वस्तुस्थिती जाणून घ्या…

कात्रज, पुणे-सातारा रस्ता, सारसबाग, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात आली. फेरी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहर, उपनगरातील प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जरांगे पाटील यांची फेरी कात्रज चौकात आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. मध्यभागात चौकाचौकात फेरीचे स्वागत करण्यात आले.