विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने ‘कुमार कोश’चे काम पूर्णत्वास गेले असून, सहा महिन्यांमध्ये कोशाचे दोन्ही खंड वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात येतील. त्याचप्रमाणे ‘बाल कोश’च्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले असून विविध प्रकल्पांची कामे गतीने करण्यात येणार आहेत.
राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्यानंतर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विविध उपक्रमांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी ही माहिती दिली. मी आखलेल्या विविध योजना साकार करण्यासाठी निधी मिळेल. कुमार कोशाचे दोन खंड सहा महिन्यांत प्रकाशित होतील. हे काम पूर्णत्वास आणले आहे. बालकोशाचे नियोजन करण्यात आले आहे. ही सगळी कामे हाती घेऊन वेगाने करत राहणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
पूर्वीच्या कामकाजासंदर्भात दीक्षित म्हणाले, प्रशासनातील नोकरशाहीचा मला अधिक त्रास झाला होता. विशेषत: माझी अडवणूक करण्यात आली होती. ज्ञानमंडळ ही संकल्पना कोशनिर्मितीसाठी योग्य नसल्याने रद्द केली गेली. त्याचा परिणाम म्हणून प्रशासनातील लोकांनी निधी अडवून ठेवला होता. त्यामुळे मला बैठका आणि कार्यशाळांचे आयोजन करणे शक्य झाले नाही. निधी नसल्याने योजनांवर काम करता आले नाही. त्या मुख्य तक्रारीला विश्व साहित्य संमेलनापासून डावलण्यात आल्याचे निमित्त मिळाले. मात्र, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घालून मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कामकाजातील अडथळे दूर होतील, अशी आशा आहे.
हेही वाचा – ज्वारीच्या क्षेत्रात ७६ हजार हेक्टरने घट; गहू, मका, हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल
मंडळासाठी सुविधा
वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा मंत्रिमहाेदयांनी यापूर्वीच केली होती. विश्वकोशासाठी वेगळी जागा घेण्यात येणार असून तेथे बांधकाम करून वसतिगृहासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे, असे डाॅ. राजा दीक्षित यांनी सांगितले.