पुणे : शिरुर तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यााला शिरुर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (वय २९, रा. पांगारी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने दिली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चाेपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शिरुर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस कर्मचारी नीरज पिसाळ, विजय शिंदे आणि पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात इंगोलेने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला वाशिम जिल्ह्यातील पांगारी कुटे गावातून इंगोलेला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात इंगोले याने पुणे जिल्ह्यातील शिरूर, चाकण, भोसरी एमआयडीसी, लोणीकंद, खडकी, आळंदी, म्हाळुंगे, दिघी, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील धाड या पोलीस ठाण्यांच्या परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले.
ग्रामीण भागात स्वस्तात दुचाकींची विक्री
इंगांले सराइत चोरटा आहे. त्याच्या घराच्या परिसरातून पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी वाशिममधील जळुका, मालेगाव, अकोला जिल्ह्यातील पातुर , बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर, लोणार, तसेच जळगावमधील जामनेर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. बनावट चावीने दुचाकी चोरून तो ग्रामीाण भागातील शेतकऱ्यांना स्वस्तात दुचाकींची विक्री करायचा, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली.