दुचाकी चोरल्या प्रकरणी चोरट्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. समाधान गणपत जगताप (वय २८, रा. यवत) असे शिक्षा सुनावलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा >>> पुणे: तरुणीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; प्रभात रस्ता परिसरातील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा
याबाबत एका दुचाकीस्वाराने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदाराची दुचाकी २४ जुलै २०२० रोजी खराडीतील एका हॉटेलच्या परिसरातून चोरीस गेली होती. चंदननगर पोलिसांनी तपास करून आरोपी समाधान जगतापला अटक केली होती. आरोपीने चोरलेली दुचाकी यवत परिसरातील जंगलात लपवून ठेवली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी बाजू मांडली.
सरकार पक्षाकडून तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी जगतापला सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलीस कर्मचारी प्रदीप धुमाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय केले.