अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्राच्या अजब निर्णयाची एप्रिलपासून अंमलबजावणी

अंधार पडला की आपण वाहनाचा दिवा (हेडलाइट) सुरू करतो. त्यासाठी वाहनाला बटनही असते. पण, यापुढे दुचाकीचा दिवा सुरू किंवा बंद करण्यासाठी असणारे बटनच शिल्लक नसेल. दिवस असो वा रात्र, दुचाकी सुरू असेल तोवर दिवाही सुरूच राहणार आहे. अपघातांना आळा घालण्याचे कारण देत केंद्र शासनाकडून एप्रिलपासून सर्वच दुचाकींना अ‍ॅटोमॅटिक हेडलाइट ऑन (एएचओ) यंत्रणा सक्तीची केली आहे. मात्र, त्यापूर्वीच अशा दुचाकी बाजारात दाखल झाल्या असून, त्यांची खरेदी होत आहे. कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनीही ‘एएचओ’ यंत्रणेच्या दुचाकी निर्मितीबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला.

दिवा बंद न होणाऱ्या काही दुचाकी सध्या रस्त्यावरही धावत असून, दिवसाही सुरू असलेल्या दिव्यामुळे चालक आणि रस्त्यावरून जाणारी इतर मंडळीही बुचकळ्यात पडत आहेत. दुचाकीशी संबंधित अपघातांना आळा घालण्याचा एक उपाय म्हणून दुचाकीचे दिवे कोणत्याही वेळेत सुरू राहावेत, अशा प्रकारची ‘एएचओ’ ही यंत्रणा दुचाकीसाठी सक्तीची करण्याचा विचार केंद्र शासनाच्या परिवहन खात्याने मागील वर्षी जाहीर केला होता. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशननेही (एआरएआय) याबाबत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत प्रस्ताव दिला होता. रस्ते अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीनेही दुचाकी वाहनांसाठी ‘एएचओ’ यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित केले होते. ही यंत्रणा जगभरातील अनेक देशांमध्ये दुचाकींसाठी सक्तीची करण्यात आली असून, ती अपघात रोखण्यासाठी उपयुक्त ठरल्याचेही समितीने म्हटले होते.

गोंधळ आणि त्रास

रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वाहनाचा दिवा दिवसा सुरू असल्यास समोरून जाणारी व्यक्ती संबंधित वाहन चालकाला हाताने खुणावत दिवा बंद करण्याची कल्पना देते. मात्र, दिवा बंदच न होणाऱ्या दुचाकी आता बाजारात आणि रस्त्यावरही येत आहेत. दुपारच्या लख्ख प्रकाशात दुचाकीचा दिवा सुरू असल्याने रस्त्यावरून येणारे-जाणारे संबंधित चालकाला दिवा बंद करण्यासाठी खुणावतात. ही दिवा बंद न होणारी दुचाकी असल्याचे नागरिकांना कसे सांगणार, असा प्रश्न ‘एएचओ’ यंत्रणेची दुचाकी घेतलेल्या एका नागरिकाने उपस्थित केला. आवश्यकता नसताना दिवा सुरू असल्याने रस्त्यावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित दुचाकी वितरकाकडून बदलून घेतल्यानेही या नागरिकाने स्पष्ट केले.

यंत्रणा अनिवार्य

पहिल्या टप्प्यात देशभरातील सर्व दुचाकींना एप्रिल २०१७ पासून हेडलाइट बंद न करता येणारी यंत्रणा सक्तीची करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार उत्पादकांनाही सूचना देण्यात आल्या असल्याने नव्या दुचाकी उत्पादित करताना त्यास ‘एएचओ’ यंत्रणा वापरली जात आहे.

निर्णय का?

केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात दुचाकीशी संबंधित आहेत. एका वर्षांत तीस हजारांहून अधिक नागरिकांचा त्यात बळी जात आहे. त्याचप्रमाणे सव्वा लाखांहून अधिक नागरिक जखमी होत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader