इंदापूर: छेडछाड केल्याची धमकी देऊन टेम्पो चालकांना लुटण्याचा प्रकार इंदापुरात उघडकीस आला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो मधून लिफ्ट घेत प्रवास करणाऱ्या दोन महिलांनी टेम्पोचालकास आमची तू छेडछाड केली .म्हणून आम्ही आरडाओरडा करू.तुझ्याजवळ जे काय पैसे  आहे. ते आम्हाला दे. असे म्हणत टेम्पोतील चैन असलेल्या कप्प्यातील अडीच लाख रुपयाची रोकड घेऊन या महिला पोबारा करत असतानाच चालकाने प्रसंगावधान राखून चोर.. चोर म्हणून ओरडल्याने परिसरातील लोकांच्या मदतीने  इंदापूर पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. 

ही घटना काल दुपारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक टोलनाक्याजवळ घडली. टेंपो चालक शरताज चाँद सय्यद वय (४०) रा. तुळजा भवानी विदयालय जवळ, सोमाटणे फाटा तळेगांव दाभाडे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी राणी सिकंदर शिंदे वय ४१ रा. मोरवंची ता. मोहोळ जि. सोलापुर 2) स्वाती वसंत शिंदे वय २४ रा. मोरवची ता. मोहोळ जि. सोलापूर यांना अटक केली आहे.

इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार फिर्यादी चालक हा सोलापूर बाजुकडून कडून तळेगाव दाभाडे कडे जात असताना या दोन महिलांनी चालकास तळेगाव दाभाडे येथे जाण्यासाठी लिफ्ट मागितली. सदर टेम्पो हा प्रवास करीत इंदापूर जवळ टोल नाक्या नजीक आला असताना सदर महिलांनी तुझ्याकडे असलेला किंमतीऐवज आम्हाला दे. नाही तर आम्ही तू आमची छेडछाड केल्याची  आरडाओरडा करू.अशी धमकी देत त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा करत असतानाच सदर चालकाने आरडाओरडा केल्याने तेथील लोकांनी या महिलांना थांबवून ठेवले.

एकाने पोलिसाला फोन केला असता, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी फौजदार गावडे ,हवालदार कानतोडे यांच्यासह महिला पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठवून सदर महिलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून महिलांच्या  पर्सची तपासणी केली असता चालकाने फिर्यादीत नमूद केलेली मोठी रक्कम त्यांच्याकडे आढळून आली.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाने फौजदार गावडे व हवालदार कानतोडे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सिनेस्टाईल ही घटना घडल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती .हा प्रकार उघड झाल्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या- येणाऱ्या चालकांमध्ये या प्रकारामुळे मोठी भीती निर्माण झाली असल्याचे दिसून आले.

Story img Loader