पुणे : रस्त्याच्या कडेला असलेल्या उपाहारगृहामध्ये न्याहरी करीत असलेल्या दोघा तरुणांवर टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खडकी बाजार येथे बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी झालेल्या या घटनेमध्ये टेम्पोचालकासह महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
नितेश विनोद पवार आणि राजू चौबे (रा. दर्गा वसाहत, खडकी) अशी गंभीर जखमीं झालेल्या दोघांची नावे आहेत. राहुल मोहिते ऊर्फ बुरण्या, गणेश साळुंखे ऊर्फ छोट्या लोहार, नकुल गायकवाड, अंश गोपनारायण ऊर्फ जंगल्या, आदित्य वाघमारे ऊर्फ ड्रँगो, तुषार राजेंद्र डोके ऊर्फ बबलु डोके, चाँद शेख, गौरव (सर्व रा. महादेववाडी, खडकी) यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. नितेश विनोद पवार (वय २४, रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे टेम्पोचालक असून, राजू चौबे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ते दोघेही बुधवारी दुपारी पदपथावरील उपाहारगृहामध्ये न्याहरी करत होते. त्यांचा आरोपींशी काहीही संबंध नसतानाही आरोपी राहुल मोहिते आणि इतर आरोपी तेथे आले. त्यांनी पवारला शिवीगाळ केली. हल्लेखोर नकुल गायकवाडने पवार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अंशने फरशी फेकून मारुन जखमी केले. त्यानंतर टोळक्याने राजू चौबे याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. दहशत माजवत टोळके निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ तपास करीत आहेत.