पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. कॉलेजचा तास बंक करून सात ते आठ तरुण तळेगाव परिसरात असणाऱ्या कुंडमळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले. तिथे, पाण्याचा अंदाज न आल्याने अशोक गुलाब चव्हाण वय- १८ आणि अंकित वर्मा वय- १७ या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या तरुणांना स्थानिक गावकऱ्यांनी कुंडमळ्यात न जाण्याचा सल्ला दिला होता. पण तरुणांनी ऐकलं नाही आणि ते कुंडमळ्यात पोहण्यासाठी उतरले पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अशोक चव्हाण आणि अंकित वर्मा हे त्यांच्या इतर पाच ते सहा मित्रांसह चिखली येथील कॉलेज बंक करून तळेगाव परिसरात असणाऱ्या कुंडमाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, कुंडमळ्यात पोहण्याचा आनंद घेण्याअगोदर स्थानिक नागरिकांनी तसेच कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी तरुणांना कुंडमळ्यात जाण्यास मज्जाव केला होता. पाणी खोल आहे. पाण्यात उतरू नका, असे सांगितलं होतं. परंतु, अल्लड मुलांनी उलट त्यांनाच उत्तरो दिली. सात ते आठ मुलं पाण्यात उतरले. पैकी, अशोक आणि अंकित पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले.
हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती
एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा मिळाला तर दुसऱ्याचा मृतदेह शनिवारी (आज) सकाळी मिळाला आहे. पोलिसांनी याबाबत मृत तरुणांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर ते कॉलेज बंक करून तळेगाव परिसरातील कुंडमळ्यात पोहण्यासाठी आले असल्याचं समोर आले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजून पावसाळा संपलेला नाही. पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन पर्यटन करावे, तसेच कुंडमळ्यात पोहण्याचा मोह टाळावा, असे आवाहन तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी पर्यटकांना केले.