ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहचवल. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण, पाठीत वार केला, तर वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला अशाच पध्दतीने महाराष्ट्र गाडेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. तसेच, मोदीजी ४ जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – शेतकरी कामगार पक्ष – स्वराज इंडिया – मित्र पक्ष  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीश्वरांची चावी असलेल्या दोन माकडांना आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देखील घेता येत नाही. त्या  माकडांना सांगतोय की बाप बदलण्याची गरज मला नाही. तुम्हाला आहे. माझे वडिल चोरून तुम्ही मते मागता. तुमच्या वडिलांचे नाव सांगितले, तर लोक दारात उभे करणार नाहीत. जो नकली शिवसेना म्हणेल, ते बेअकली आहे. त्यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत. मोदींना काही ठरवता येत नाही. त्यांचे काय करायचे, ते जनतेने ठरवलेले आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करणारा निर्णय होता, हे न्यायमूर्तींनी म्हटले होते.

हेही वाचा >>> गणेश यादव’काँग्रेसमध्ये विलीन होण्यास शिवसेना छोटा पक्ष नाही,’ उद्धव ठाकरे यांचे भाजपला प्रत्युत्तर

हे मोदी सरकार नाही, गजनी सरकार आहे. त्यांना काल काय बोलले, ते आज आठवत नाही. अच्छे दिन म्हणत १५ लाख खात्यात येतील, म्हटले होते. पैसे भाजपच्याच खात्यात गेले. त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्र्यांचे पतीने इलेक्ट्रॉल बॉण्ड हा सर्वात मोठा घोटाळा म्हटला आहे. कंत्राटी पद्धत आणली. अग्निवीरसारखी योजना चार वर्षे काम देता. बाकी सगळे कंत्राटी, मी कायमस्वरुपी, असे मोदींचे धोरण आहे. पण, आता आम्ही तुमचे कंत्राट संपवणार असून ४ जूनला कंत्राटमुक्त करू. 

भाजपला घटना बदलायची आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही पाळाय़ची, हे त्यांना खुपते आहे. तुकारामांच्या वेळेला जो मंबाजी होता. तीच मानसिकता आज यांची आहे. तुम्ही आम्हाला काय हिंदूत्व शिकवता. जय श्रीराम, गणपत्ती बाप्पा मोरया आम्ही पण म्हणतो. जय भवानी, जय शिवाजी या जयजयकारात झोपलेल्या जागा करण्याची ताकद आहे.

मोदी तुम्ही आमच्या सुखात मीठ कालवत आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गुजरात आणि देशात भिंत का बांधत आहात ? तोही आमचा आहे. मात्र, महाराष्ट्रात कंपनी ठेवायची असेल, तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल. भाजपला राजकारणात मुले होत नाहीत. त्यात आमचा दोष काय ? तुम्हाला मुले होत नाहीत. वडिलही नाहीत. म्हणून मी भाजपला भेकड म्हणतो. जनतेचे प्रेम तुम्ही कमावू शकलेले नाहीत. माझे शिवसैनिक माझे निवडणूक रोखे आहेत, असेही उद्घव ठाकरे यांनी ठणकावले.

हेही वाचा >>> ऐन उन्हाळ्यात साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना दिलासा; किती दिली एफआरपी?

मोंदींचा गल्लीबोळात प्रचार, आताच ते रस्त्यावर आले: ठाकरे

भुताची भीती वाटली की राम राम म्हणायचे. आता यांना पराभवाची भीती वाटली की राम राम करत फिरतात. मोदीजी गल्लीबोळात प्रचारासाठी जात आहेत. मुंबईमध्ये तुम्हाला रोडशो करावा लागतो. मग, दहा वर्षात काय कमावले ? आजच त्यांना रस्त्यावर आणले आहे. ४ जूनला आणखी रस्त्यावर आणणार आहोत. त्यांनी मागे अचानक टीव्हीवर येऊन नोटबंदी केली होती. तसेच मोदीजी ४ जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. तुम्ही जसे नोटाबंदी केली, तसा महाराष्ट्र तुमची नाणेबंदी करेल.

संजोग वाघेरेंना लोकसभेत पाठवा : उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे यांना जाहीर केली होती. त्यांचा प्रचार करण्याची गरज देखील आता उरलेली नाही. हे समोर बसलेला जनसमुदाय़ पाहून स्पष्ट झालेले आहे. त्यांना मावळमधून प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा, असे आवाहन या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt chief uddhav thackeray slams pm modi during campgain for candidate sanjog waghere kjp 91 zws