लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघावर महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जात असताना मावळचे आगामी खासदार श्रीरंग बारणे हेच असतील. त्यामुळे कोणीच चिंता करण्याची आवश्यकता नाही असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

मावळ लोकसभा मतदारसंघ महायुती कोणाला मिळणार, कोण लढणार याची चर्चा सुरू होती. आता उद्योगमंत्री सामंत यांनी २०२४ मध्येही मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार असल्याचे सांगत मावळची जागा शिवसेना लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मावळमधून कोण लढणार या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे काम करत आहेत. निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखला दिला जात आहे. त्यामुळे शास्त्रीय सांख्यिकी (इपिरिकल डाटा ) तपशील गोळा करून टिकणारे आरक्षण दिले जाणार आहे. तशा सूचना राज्य मागासवर्गीय आयोगाला दिल्या आहेत.

आणखी वाचा-सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; पत्रात ललित पाटील प्रकरणाची धक्कादायक माहिती असल्याचा दावा

राजकारणात मंत्री छगन भुजबळ यांच्या एवढा अनुभव नसला तरी राजकीय तेढ कुठेही निर्माण होणार नाही याची दक्षता दोन्ही बाजूंनी घेतली पाहिजे. कारण, महाराष्ट्र राज्याला एक फार मोठी राजकीय संस्कृती आहे. त्याचे पालन माझ्यासह सर्वांनी केले पाहिजे अशी माझी अपेक्षाही मंत्री सामंत यांनी व्यक्त केली.