पुणे : शहरातील गुन्हेगारी घटना, तसेच बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी अचानक नाकाबंदी केली. नाकाबंदीत तीन हजार वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या ५१४ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून सात लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांनी या कारवाईत ७२ वाहने जप्त केली.

शहर परिसरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली. पोलिसांनी दोन हजार ८५३ वाहनचालकांची तपासणी केली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा न लावणे, तसेच ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री दहा ते बारापर्यंत प्रमुख रस्ते, तसेच चौकात पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या ५१४ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून सात लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला, तसेच ७२ वाहने जप्त केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, तसेच १८७२ पोलीस कर्मचारी नाकाबंदी कारवाईत सहभागी झाले होते. यापुढील काळात शहरात अचानक नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader