महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये छत्रपती संभाजीमहाराज यांचे तैलचित्र राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बसविण्याच्या ठरावाला मंगळवारी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसनेच विरोध केला. काँग्रेसनेही या ठरावाला विरोध करून भोसले यांच्याऐवजी आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते हे तैलचित्र बसवावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला.
मुख्य इमारतीमध्ये महापौर प्रभागाकडे असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या तैलचित्रासमोर छत्रपती संभाजीमहाराज यांचे तैलचित्र बसविण्यासंबंधीचा ठराव राष्ट्रवादीनेच दिला होता. तसेच ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बसवावे, असेही ठरावात म्हटले होते. हा ठराव गेले काही महिने निर्णयाअभावी पुढे ढकलला जात होता. हा ठराव मंगळवारी सभेत पुकारला जाताच त्याला राष्ट्रवादीनेच विरोध केला. राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व उदयनराजे भोसले यांच्यात मोठा वाद आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याऐवजी आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते तैलचित्र बसवावे, अशी उपसूचना या वेळी राष्ट्रवादीकडून देण्यात आली. मात्र, या उपसूचनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने विरोध केला.
उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचेच खासदार आहेत, याची आठवण या वेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना करून दिली. खासदार भोसले हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते तैलचित्र बसवणे योग्यच आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. वसंत मोरे, अशोक येनपुरे, अशोक हरणावळ यांनी या वेळी उदयनराजे यांना बोलावण्याचा आग्रह धरला. अखेर या उपसूचनेवर अखेर मतदान घेण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांनी बहुमताने उपसूचना मंजूर करून घेतली.

Story img Loader