लोकसभेच्या रणांगणात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे ‘भाऊबंदकी’ चे नाटय़ रंगले असतानाच मावळच्या रंगतदार लढतीत शेवटच्या टप्प्यात राज-उद्धवच्या सभा लागोपाठ होत आहेत.
मावळ लोकसभेच्या निमित्ताने शिवसेनेत बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या आहेत. विद्यमान खासदार गजानन बाबर यांचा पत्ता कापून सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांची वर्णी लागली. उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत बाबरांनी पक्ष सोडला, त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पक्षाच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडील मावळ संपर्कप्रमुखपदाचा कार्यभार काढून माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याकडे सोपवण्यात आला. याशिवाय, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनाही मावळमध्ये विशेष स्वरूपात पाठवण्यात आले. ही जागा राखण्याचे आवाहन शिवसेनेसमोर आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. बारणे यांच्यासाठी त्यांनी घाटाखालच्या भागात एक सभा घेतली व १४ एप्रिलला चिंचवड मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे.
गेल्या निवडणुकीत मनसेचा उमेदवार रिंगणात नव्हता, त्याचा फायदा शिवसेनेला झाला. यंदा स्वत:चा उमेदवार रिंगणात न उतरवता मनसेने शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पािठबा दिला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले खासदार बाबर व त्यांचे समर्थक मनसेत दाखल झाले आहेत. मावळची जागाजिंकून सेनेला धक्का देण्यास राज उत्सुक आहेत. त्यांची सभा १३ एप्रिलला चिंचवड परिसरात होत आहे. ठाकरे बंधूंच्या लागोपाठ सभा होत असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रंगत शिगेला  पोहोचणार आहे. दोघांच्या सभांना गर्दी होणार, हे उघड असून त्याचा राजकीय फायदा नेमका कोणत्या उमेदवाराला होणार, याबाबत उत्सुकता आहे.

Story img Loader